Wednesday, 7 September 2011

चित्रपटातले गणराय

 

'गणेश चित्रपटां'चं वैशिष्ट्य असं, की त्यांमध्ये बटबटीतपणा नाही. भोळ्याभाबड्या प्रेक्षकांच्या मनामध्ये भोळाभाबडा भक्तिभाव निर्माण करणारे हे चित्रपट आहेत. बहुतेक 'गणेश चित्रपटां'मध्ये गणरायांभोवती कथा गुंफलेली असते, त्यामुळे देवाचं गुणगान त्यांच्यात उगीचच घुसडल्यासारखं वाटत नाही.


चित्रपटाचा नायक सचिनचा गणपतीवर अजिबात विश्‍वास नाही आणि त्याच्या पत्नीचा मात्र प्रचंड विश्‍वास. गणपतीवरच्या अविश्‍वासामुळे सचिनवर अनेक विघ्ने येतात, कारखान्याला आग लागते, पत्नी आजारी पडते. शेवटी त्याची पत्नी त्याला अष्टविनायकांच्या यात्रेला येण्यासाठी भाग पाडते. या यात्रेत एका देवळात ते दर्शनाला गेले असतानाच ते कारखान्याबाबतचे प्रकरण न्यायालयात जिंकल्याची माहिती त्यांचे कुटुंबस्नेही देतात आणि सचिनची मग गणपतीवर श्रद्धा बसते. 'अष्टविनायक' चित्रपटातलं हे दृश्‍य. ते बघून प्रेक्षकांच्याही मनात भक्तिभाव निर्माण होतो. या चित्रपटातलं 'अष्टविनायका तुझा महिमा कसा' हे गाणं तर प्रत्येक गणेशोत्सवात, प्रत्येक मंडळात आणि प्रत्येक घरी वाजलंच पाहिजे, असा अलिखित नियमच आहे. हे मराठीतलं सगळ्यांत मोठं गाणं वेगवेगळ्या लोकगीतप्रकारांवर आधारित आहे. एकूणच मराठीतला खास "गणेश चित्रपट' असं त्याचं वर्णन करावं लागेल; पण हा काही मराठीतला एकमेव "गणेश चित्रपट' नव्हे. गणेशाच्या भक्तीमध्ये अनेक चित्रपट न्हाऊन निघाले आहेत.

एकूणच गणेश हा मराठी चित्रपटांचा अतिशय लाडका देव आहे. हिंदी चित्रपटांमध्ये देवाची संकल्पना, देवाची मूर्ती यांचा अतिशय बटबटीत वापर करून घेतला जातो. शंकराच्या किंवा देवीच्या मूर्तीसमोर नायक किंवा नायिका उभी आहे, विजा कोसळत आहेत, घंटा जोरजोरात हलत आहेत, वाऱ्यानं पानं उडत आहेत, मूर्तीच्या मागे आजूबाजूला निळा प्रकाश आहे आणि नायक किंवा नायिका "आज खूष तो बहोत होंगे तुम' किंवा "मैं आज तुम्हे मनायेबगैर यहांसे हटुंगी नहीं,' असे संवाद म्हणत आहेत, अशी दृश्‍यं आपण या चित्रपटांमध्ये खूप बघितली आहेत. मराठीतल्या "गणेश चित्रपटां'चं वैशिष्ट्य असं, की त्यांमध्ये असा बटबटीतपणा नाही. भोळ्याभाबड्या प्रेक्षकांच्या मनामध्ये भोळाभाबडा भक्तिभाव निर्माण करणारे हे चित्रपट आहेत. बहुतेक 'गणेश चित्रपटां'मध्ये गणरायांभोवती कथा गुंफलेली असते, त्यामुळे देवाचं गुणगान उगीचच घुसडल्यासारखं वाटत नाही. या चित्रपटातले चमत्कार हे हास्यास्पद, अतर्क्‍य नसतात. बऱ्याचदा देव मृत व्यक्तीला जिवंत करतो, महाप्रचंड रूप घेतो, अचंबित करणारे चमत्कार करतो, असं चित्रपटांत दाखवलं जातं. गणेश चित्रपट मात्र त्याला अपवाद आहेत. त्यात चमत्कार अर्थातच आहेत; पण ते अविश्‍वसनीय वाटत नाहीत. देवाच्या चमत्काराबरोबरच अंतरातील देवत्वही जागृत करण्याचं थेटपणे किंवा आडवळणानं त्यात सांगितलं जातं आणि त्यामुळेच ते लोकांना आवडतात.

'गणेश चित्रपटा'मध्ये 'अष्टविनायक' हे सगळ्यांत उत्कृष्ट उदाहरण. सचिननं मराठी चित्रपटात नायक म्हणून पदार्पण केलेला हा पहिलाच चित्रपट. विशेष म्हणजे सचिननं बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटांत दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केलं, त्या 'नवरा माझा नवसाचा'मध्येही गणराय आहेतच. या चित्रपटात विनोद, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचं फार छान संतुलन सचिननं राखलं आहे. 'तू सुखकर्ता' नावाचा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. त्यातही नायकाचा 'ब्रेन ट्यूमर'चा रोग गणपती कसा बरा करतो, याची कथा होती. श्रीधर फडके यांच्या संगीतानं तारलेला 'विश्‍वविनायक' नावाचा चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता, मात्र तो तितकासा चालला नाही. प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे आता दिग्दर्शनात उतरले आहेत. 'सिद्धिविनायक' या चित्रपटाद्वारे ते आपल्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा करत आहेत. अमिताभ बच्चन सध्या चित्रपट, जाहिराती, जाहीर कार्यक्रम, ब्रॅंड अँबेसिडर अशा अनेक उपक्रमांमध्ये व्यग्र असला, तरी मागे काही काळ त्यानं आपल्या अभिनय कारकिर्दीला विश्रांती दिली होती, तेव्हा तो आणि जया बच्चन या दोघांनी 'अक्का' या मराठी चित्रपटात एका गणपती आरतीद्वारे दर्शन दिलं होतं.

मराठीतील 'गणेश चित्रपटां'ची अशी बरीच उदाहरणं देता येतील. एक मात्र खरं आहे, की देवीचा, विठ्ठलाचा महिमा गाणारे अनेक चित्रपट मराठीत असले, तरी गणराय मात्र अलीकडेच चित्रपटांमध्ये दर्शन द्यायला लागले आहेत. गणपतीवर मराठी माणसाची अपरंपार श्रद्धा आहे, त्यामुळे त्याचे चित्रपटही तो भक्तिभावानं पाहतो. या चित्रपटामुळे त्याला गणपती पावतो की नाही माहीत नाही; पण सगळ्यांशी चांगुलपणानं वागावं, अशी बुद्धी तरी तो नक्की देतो, यात काही शंका नाही!

- मंदार कुलकर्णी

No comments:

Post a Comment