देवा तूंचि गणेशु
ॐकारस्वरूपी गणेश
नवरसांचे सागर भरवीत, साहित्य रत्नांचे आगर निर्माण करीत, भावार्थाचे गिरीवर स्थापन करून साहित्य सोनियाच्या खाणी उघडवित, ब्रह्मरस सुसंवाद घडविणाऱ्या "ज्ञानेश्वरी' ग्रंथाच्या आरंभी ॐकारस्वरूपी गणेशाला वंदन करून ज्ञानेश्वरीचा वाग्प्रपंच संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी उभा केला. श्री ज्ञानदेव म्हणतात -ॐ नमो जी आद्या । वेदप्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।सर्व विश्वाच्या मुळाशी असणाऱ्या, ज्ञानराशिरूप वेदांनी ज्याच्या रूपाचे विस्ताराने वर्णन केले, असा वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या "वेदप्रतिपाद्या' आणि सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या, स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या स्वसंवेद्या, आत्मरूपी श्रीगणेशा तुला वंदन असो.
आध्यात्मिक स्वरूप
वेदान्त्यांनी आणि तत्त्वचिंतकांनी गणपतीला वाङ्मयाच्या तळाशी आणि नादाच्या मुळाशी नेऊन बसविले आहे. गणपती अथर्वशीर्षात गणपतीच्या आध्यात्मिक स्वरूपाचे सार दिले आहे. "हे गणेशा, तू तत्त्व आहेस, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, तू आत्मा आहेस; तू ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस. ज्ञान हे स्वरूप आणि विज्ञान हे दृश्यरूप होऊनच गणेश ज्ञानविज्ञानमय झाला आहे. गणरायाचे ॐकाररूप मांडताना श्री ज्ञानदेवांच्या मनःचक्षूंसमोर शब्दमय ज्ञान साकार रूपात उभे राहिले. वेद म्हणजे मूर्तिमंत ज्ञान, तर त्या ज्ञानाचे मूर्तिमंत मंगलरूप म्हणजे श्रीगणेश.हे शब्दब्रह्म अशेष ।तेचि मूर्ती सुवेष ।
तेथ वर्ण वपु निर्दोष । मिरवत असे ।
शब्दब्रह्मरूप
विश्वरूपवृक्षाचा नामरूपरंगमय विकास आणि विस्तार ॐ या ध्वनिबीजाने होतो. ओंकाराला पदार्थसृष्टीमध्ये आणण्याचे काम गणेशमूर्तीने केले. ज्ञानेश्वरीत गणेशाचे हे ॐकाररूप वर्णिले आहे.अकार चरणयुगुल ।उकार उदरविशाल ।
मकार महामंडल ।मस्तकाकारे ।
हे तिन्ही एकवटले तेथ शब्दब्रह्म कवळले ।"अ'कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन, "उ'कार म्हणजे विशाल पोट आणि "म'कार म्हणजे त्याचे मस्तक. अकार, उकार आणि मकार या तिन्हींचा एकमेळ झाला, की जो "ॐकार' होतो त्यातच सर्व वाङ्मयविश्व सामावते. तिथे शब्दब्रह्मरूप वेद कवेत मावण्याजोगा होतो.
तत्त्वरूप गणपती
श्री ज्ञानदेवांनी वर्णिलेले गणेशरूप अद्वितीय आहे. ज्ञानदेवांनी तत्त्वरूप गणपती उभा केला आहे. ते म्हणतात चारही वेद हे तुझे शरीर, स्मृती हे शरीराचे अवयव आहेत.स्मृति तेचि अवयव । देखा अंगीकभाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थ शोभा ।त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने तत्त्वाचे आणि शब्दांचे लावण्य उभे राहिले आहे. रत्नखचित अलंकाराऐवजी तू अठरा पुराणे आपल्या अंगावर धारण केली आहेस. त्या पुराणातील ज्ञानसाधक तत्त्वांनी तेजःपुंज मौक्तिकांचे आणि रत्नांचे रूप धारण केले आहे आणि छंदोबद्ध शब्द, तसेच त्याचा गर्भित अर्थ, हीच त्या रत्नांची कोंदणे आहेत.
साहित्यशब्द रूप
ज्ञानदेवांनी गणेशाला साहित्यशब्द रूपातही मांडले आहे. ते म्हणतात, उत्तम शब्दरचना हेच गणपतीच्या अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे. विविध साहित्य रंगांनी आणि नवरसांनी भरलेले ते शब्दवस्त्र गणपती अंगावर अभिमानाने मिरवीत आहे.देखा काव्यनाटका । जे निर्धारिता सकौतुका ।
त्याची रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ।काव्य आणि नाटकांनी घागऱ्यांचे रूप धारण केले आहे. त्या काव्य-नाटकरूपी घागऱ्यांच्या क्षुद्र घंटिका रुणझुणताना त्यातून जीवनानंदाचा मधुर ध्वनी उमटत आहे. व्यासादिक आद्य कवींच्या बुद्धिमत्तेचा शेला गणरायाच्या कमरेला झळकत आहे आणि व्यासादिक प्रज्ञावंतांच्या मतीचे पल्लव त्या मेखलेत मिरवीत आहे.
निर्गुण तत्त्वदर्शन
संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी गणपतीचे तत्त्वरूप मांडून निर्गुण तत्त्वदर्शन गणेशाच्या रूपाने सगुणात आणले आहे. ते म्हणतात, चार वेद हे त्याचे शरीर, अठरा पुराणे ही भूषणे, तसेच पातंजल, सांख्य, वैशेषिक, न्यायमीमांसा आणि वेदान्त ही षड्दर्शने म्हणजे त्याचे सहा हात आहेत. या षड्दर्शनांच्या भुजा विविध मतांच्या आयुधांनी युक्त आहेत.तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ।।
तर्कशास्त्र हा त्याच्या हातातील फरशु आहे. न्यायशास्त्र हा अंकुश तर वेदांतशास्त्र हा त्याच्या हातातील गोड आणि रसाळ मोदक आहे.
विचारतत्त्व गुणदर्शन
विचारतत्त्वाचे गुणदर्शन म्हणून ज्ञानदेव गणरायाकडे पाहतात. ते म्हणतात, गणरायाचे सर्व अवयव हे अक्षरविचारतत्त्वांचे रूप आहे. अतिनिर्मळ विचार ही त्याची सरळ सोंड आहे आणि ती जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।गोड अशा वेदांताच्या मोदकाकडे झुकली आहे. विवेकाच्या सरळ शुंडादंडावर महासुखाचा परमानंद उसळत आहे. "संवाद' हाच गणरायाचा विशाल दात आहे. आणि समता ही त्या दातांची शुभ्रता आहे. श्रद्धा आणि बुद्धीचे प्रतीक असणारे दोन दात दुरूनही चकाकत आहेत. उन्मेष हेच त्या गणरायाचे सूक्ष्म नेत्र आहे. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे त्याचे दोन कर्ण आहेत. आणि कोणताही विचार पाखडून स्वीकारण्यासाठी त्याने सुपाएवढे कान धारण केले आहेत.
तत्त्वानंद रूप
संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या आरंभी गणरायाचे तत्त्वानंद रूप उभे केले आहे. ते म्हणतात -
हरुष हे वदन गणराया । ऱ्ही पुरुषार्थ त्याची चाऱ्ही भुजा ।हे गणराया, मूर्तिमंत आनंद हेच तुझे मुख आहे. चारी पुरुषार्थ हे चार हात, तर प्रकाशवंतांना प्रकाश देणारा, तो तुझा चमकणारा दात आहे. तुझ्या मुखामध्ये परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी हात जोडून उभ्या आहेत. सकल सृष्टी आत्मरूपाने दिसणारी तुझी दिव्य आणि सुखसंतुष्ट दृष्टी आहे. शुद्ध सत्त्वाचे सुंदर शुभ्र वस्त्र तू नेसला आहेस. तू आपल्या हाताने हर्षाचे मोदक होऊन सर्वांना तृप्त करतोस. फार काय सांगावे, तुला जो पाहतो त्याचा संसार सुखाचा होतो.तुज देखे जो नरु । त्यासी सुखाचा होय संसारू ।।
नादरूप गणेश
समर्थ रामदास स्वामींनी गणपतीच्या तत्त्वाबरोबर त्याचे नादरूपही उभे केले आहे. समर्थ म्हणतात, गणपती हा चौदा विद्यांचा स्वामी असून, लहान डोळे हलवीत आणि लवलवीत कान फडकावीत जेव्हा गणराय येतो, तेव्हा मूर्तिमंत संगीतच अवतरले जाते.नट नाट्य कळा कुसरी । नाना छंदे नृत्य करी ।
टाळ मृदुंग भरोवरी । उपांग हुंकारे ।।त्याच्या पायांतली नूपुरे रुणझुण वाजतात आणि पायांच्या ठेक्याने सुंदर पदन्यास उभा राहतो. हावभाव आणि कलाकौशल्य यासह नर्तन रंगू लागते. टाळ-मृदुंगाची साथ मिळते. नाद, सूर, ताल, स्वर आणि तत्त्व यासह जेव्हा गणपती नर्तन करू लागतो, तेव्हा ईश्वरी सभा शोभायमान होते. त्याचे हे दिव्य ईश्वरी नर्तनच कीर्तन ठरते.
आदिबीज आणि निर्गुणाचा मुळारंभ
श्री गणपती ही विद्येची देवता आहे. कलेची देवता आहे. तशीच ती सारस्वताची देवता आहे. गणेश हा गणांचा ईश आहे. समूहमनाचा देव आहे. मानवी मनाच्या श्रद्धेला फुटलेला पहिला अंकुर आहे.संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी त्याला "आदिबीज' म्हणून स्वीकारले आहे, तर समर्थांनी त्याला "निर्गुणाचा मुळारंभ' म्हटले आहे.देवा तूंचि गणेशु । सकल मति प्रकाशु ।वैदिक वाङ्मयापासून संतरचनेपर्यंत आणि सूक्तांपासून लोककलेच्या गणापर्यंत वावरणाऱ्या गणेश देवतेने दैवत युगांच्या प्रवासात नाना स्थित्यंतरे पावत विद्वानांपासून, प्रज्ञावंतांपासून, कलावंतांपासून सामान्य जनांच्या भावभावनांच्या गाभाऱ्यातही अढळ स्थान मिळविले आहे.
- डॉ. रामचंद्र देखणे

No comments:
Post a Comment