Wednesday, 7 September 2011

माहितीच्या महाजालातील महागणपती

गणपती म्हणजे साक्षात विद्येची देवता.


ज्याच्यात संपूर्ण ब्रह्मांडातील ज्ञान आणि विज्ञान सामावले आहे.

सर्वार्थाने 'त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि' अशीच.

म्हणूनच या अत्याधुनिक जगात संगणकाची तुलना अनेकदा गणपतीशी केली जात असावी.

...अन्‌ मग इंटरनेटची तुलना कशाशी करायची? गणपतीच्या ज्ञानाशी!

इंटरनेट!

सर्च इंजिनला एखादा शब्द देऊन पाहा.

दुसऱ्याच क्षणी त्याबाबत जगभरात असलेल्या सर्व माहितीचा खजिना घेऊन अनेक वेबसाइट्‌स तुमच्या समोर हजर!

इंटरनेट म्हणजे माहितीचे महाजालच. कोणतीही माहिती, संदर्भ मिळवण्यासाठी पूर्वीप्रमाणे फारशी शोधाशोध करण्याची गरज नाही. जगभरातील सर्व ज्ञान, विज्ञान, माहिती इंटरनेटने घराघरांत पोचविले आहे.

माहितीच्या या महाजालात प्रत्येकाच्या मनामनात वसलेला, हृदयसिंहासनावर विराजमान झालेला गणपतीबाप्पा कुठे आहे? त्यालाच (काही वेबसाइट्‌सवर) शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न.

मराठमोळ्या माणसाला त्याचा असा शोध घ्यायचा असेल तर (तसेच माहिती कमी अन्‌ शोधच जास्त हा प्रकार टाळायचा असेल तर) http://www.ekmev.com/ ला जरूर भेट द्यावी. शेकडो साइट्‌सवर गणपतीविषयी माहिती उपलब्ध आहे; पण ती त्या त्या साइट्‌सवरील अन्य माहितीच्या जंजाळातून शोधून काढावी लागते. http://www.ekmev.com/ साइट मात्र या दृष्टीने "एकमेव' हे वर्णन लागू होणारी आहे. कारण या साइटवर केवळ गणपतीविषयीचीच माहिती आहे. तसेच बहुतेक वेबसाइट्‌सवर एखाददुसऱ्या मुद्द्याविषयी त्रोटक माहिती असते किंवा आपल्याला हवी असलेली माहिती नसते. "एकमेव'वर ती बरीच विस्ताराने आहे. गणपती, त्याच्याविषयीच्या कथा, जन्मकथा, माहात्म्य, त्याची विविध स्तोत्रे, त्याच्या व्रतकथा, पूजाविधी, अष्टविनायक, महाराष्ट्रातील गणपतीची जागृत देवस्थाने, गणेशोत्सव, त्याचे बदलते स्वरूप, ऐतिहासिक महत्त्व व त्याविषयीचे लेखन... अशा विविधांगी मजकुराने ही साइट सजविण्यात आली आहे. 1894 ते 1903 या काळातील "केसरी'तील लोकमान्य टिळकांचे गणेशोत्सवाबद्दलचे काही अग्रलेखही या साइटवर उपलब्ध आहेत. नेपाळ, चीन, श्रीलंका, ब्रह्मदेश, जपान, अफगाणिस्तान, इराण, व्हिएतनाम, रोम, मेक्‍सिको आदी देशांतील गणेशदर्शन या साइटवर घडते. तेथील मूर्ती कशा आहेत, याचीही कल्पना येते. एखाद्या गणेशभक्ताला हवी असलेली बरीचशी आणि इतरत्र उपलब्ध नसलेली माहिती येथे उपलब्ध आहे. मराठीबरोबरच या साइटची इंग्रजी आवृत्तीही आहे.


'लव्हिंग गणेश'
http://www.shreeganesh.com/ ही देखील केवळ गणपतीविषयीच माहिती असलेली इंग्रजीतील वेबसाइट आहे. या साइटचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील "लव्हिंग गणेश' हे ऑनलाइन पुस्तक. या पुस्तकात गणेश देवता, गणपतीचे धार्मिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक महत्त्व, विविध स्तोत्रे, मंत्र, ओमकाराचे विविध 36 प्रकार (सचित्र), गणपतीचे विविध 32 प्रकार, गणपतीचे अवयव आणि गणपतीशी संबंधित विविध प्रतीकांचे सूचक अर्थ आहेत. गणपती व त्याच्याशी संबंधित शब्दांचा तर त्यांच्या अर्थासह एक छोटेखानी कोशच या साइटवर आहे. वैविध्यतापूर्ण आणि अन्यत्र सहसा न आढळणारी बरीचशी माहिती असल्याने प्रत्येक गणेशभक्ताने आवर्जून भेट द्यावी अशी ही साइट आहे. सोबतीला गणेशाशी संबंधित शब्दांतूनच तयार होणारी काही शब्दकोडी आणि अन्य काही खेळ आहेत. गणेश फोटो गॅलरी आणि गणेश ई-कार्डसही आहेत.

http://en.wikipedia.org/wiki/Ganesh या साइटवर गणपतीविषयी बरीच सखोल, समग्र आणि अभ्यासपूर्ण माहिती आहे. गणेश, गणेशाचे वाहन, त्याला प्राप्त असलेल्या सिद्धी, त्याच्याविषयीची वेगवेगळ्या पुराणांतील माहिती, गणेश चतुर्थी, देवता म्हणून असलेले त्याचे भारतीयांच्या, तसेच अन्य देश आणि धर्मांतील लोकांच्या जीवनातील स्थान, दुसऱ्या देशांतील त्याची देवालये व इतर माहिती, आध्यात्मिक महत्त्व याविषयीची माहिती या साइटवर आहे. जैन धर्म, बौद्ध धर्म (तिबेटमधील बौद्धधर्मीय, शिंतो आणि शिंगॉन बौद्ध आणि जपानमधील बौद्धधर्मीय), आग्नेय आशियातील (थायलंड, बाली, इंडोनेशिया) या देशांतील गणेशाचे माहात्म्य, गणेश स्थाने, मूर्ती व अन्य माहिती या साइटवर उपलब्ध आहे. इंडोनेशिया हा सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत जगातील क्रमांक एकचा देश. तथापि, तेथील लोकांच्या जीवनातही गणपतीला आगळेवेगळे स्थान आहे. या देशातील चलनी नोटांवर चक्क गणपतीबाप्पाची मुद्रा आहे! काही देशांतील गणेशमूर्तींचे नमुनेही या साइटवर असून, जपानमधील कांगिटेन प्रकारातील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गणपतीविषयी बरीच वैशिष्ट्यपूर्ण आणि सखोल माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासू वाचकांसाठी ही साइट अतिशय उपयुक्त आहे. अन्यत्र न आढळणारी आणि बरीच संशोधनपूर्ण माहिती या साइटवर आढळते.


स्तोत्रे, मंत्र, पूजाविधी आणि वॉलपेपर्सही!

http://www.mahaganapathi.info/ या साइटवरही गणपतीविषयी खूप माहिती आहे. गणपती, त्याच्याविषयीच्या कथा, त्याचे स्वरूप, गणेशोत्सव याव्यतिरिक्त वैदिक, पुराण साहित्यातील त्याच्याविषयीची माहिती या साइटवर पाहायला मिळते. http://www.iloveindia.com/ या साइटवर विविध गणेशमंत्र, त्याची फलप्राप्ती, गणपती चालिसा आणि अर्थासह गणेशाची नावे आहेत. http://surajinfo.com/Ganesha/ या साइटवर गणपतीविषयी विविधांगी माहिती आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या कथा, स्तोत्रे, गणेशोत्सव याव्यतिरिक्त काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांची माहिती, ई-डेकोरेशन्स, फोटो गॅलरी यासारखे काही नवे प्रकार आहेत. ई-डेकोरेशनमध्ये काही तांत्रिक बाबींचा आविष्कार आहे. http://www.ganeshaonline.com/ ही प्रामुख्याने पेंटिंग साइट आहे आणि गणपतीविषयीची काही आकर्षक पेंटिंग्ज या साइटवर पाहायला मिळतात. www.vishvarupa.com/ganesha-1.html या साइटवरील गणेशाबद्दलची माहिती त्रोटक असली तरी त्यावरील वॉलपेपर्स गॅलरी बरीच समृद्ध आहे. गणपतीचे जवळपास दोनशे विविध आणि आकर्षक वॉलपेपर्स या साइटवर आहेत.

गणपती ही भक्तांच्या हाकेला लवकर धावून येणारी देवता आहे; पण इंटरनेटच्या "बाजारा'त त्याला पाहायला गेल्यास तो हवसे, गवसे आणि नवसे या सर्वांच्याच मदतीला धावून आलेला दिसतो. कारण गणपती माहात्म्य वर्णन करण्याबरोबरच त्याच्याशी संबंधित असलेल्या विविध बाबी, वस्तू यांचे मार्केटिंग करण्यासाठी श्रद्धाळू लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची स्पर्धा करीत असलेल्या वेबसाइट्‌सची संख्या प्रचंड आहे. काही साइट्‌सवर सहज नजर मारली तरी श्री गणेशसिद्धी मंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, महागणपती यंत्र, सरस्वती आणि गणेश यंत्र आदी सोन्या- (अस्सल 24 कॅरेटचा दावा करणारी) चांदीची, गोल्डप्लेटेड यंत्रे, पारद गणेश, पारद लक्ष्मी गणेश यासह विविध धातूंपासून व लाकडापासून बनवलेल्या विविध आकारांतील गणेशमूर्ती, गणेश रुद्राक्ष, गणेशगौरी रुद्राक्ष, गणेश रुद्राक्षमाला, कार्यसिद्धी रुद्राक्षमाला, गणेश शंख, गणेश स्वस्तिक, गणपतीच्या आरत्या, सहस्रनाम, स्तोत्रे, गाणी असलेल्या ऑडिओ-व्हिडिओ सीडीज आणि डीव्हीडीज, तसेच विविध प्रकारची होमहवने, पूजाअर्चा यांची आकर्षक जाहिरातबाजी दिसते. गणपतीविषयी समग्र माहिती एकत्रितपणे देणाऱ्या साइट्‌स तशा मोजक्‍याच आढळतील; पण श्रद्धाळू भक्तजनांच्या खिशावर डोळा ठेवून सुरू करण्यात आलेल्या साइट्‌सची रेलचेल दिसते. http://www.astroshastra.com/, http://www.rudraksha-ratna.com/, http://www.indiayogi.com/, http://www.astroyogi.com/, http://www.shopping.astrolozy.com/, http://www.lordsgalleria.com/, http://www.4indiagifts.info/ आदी साइट्‌सवर बरीच जाहिरातबाजी दिसते. त्यामुळे ग्राहकांनी अधिक चोखंदळ आणि जागरूक असण्याची आवश्‍यकता आहे.

नित्य पूजापाठ, विविध धार्मिक कार्ये ते अतिशय उत्साहाने सार्वजनिक स्वरूपात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवापर्यंत भारतीयांच्या जीवनात श्रीगणेशाचे स्थान आहे. आरत्या, स्तोत्रे, मंत्रजप, कीर्तन-प्रवचने, गाणी, कथा-पुराणे, विविध पुस्तके या स्वरूपातून आपल्याला त्याची नवनवी ओळख होत जाते. वृत्तपत्रे-टीव्ही वाहिन्या यांचाही याकामी हातभार लागत असतो. अलीकडच्या काळात त्यात भर पडली आहे ती इंटरनेटची! माहितीबरोबरच एक प्रसिद्धी माध्यम म्हणूनही झपाट्याने विकसित होत असलेल्या साधनाची. अन्‌ श्रीगणेशाच्या बाबतीत म्हणाल तर इंटरनेट आपली अजिबात निराशा करीत नाही. जगभरातील वाचकांसाठी त्याच्याविषयीची नवनवी माहिती व न संपणारा माहितीचा साठाच इंटरनेटने उपलब्ध करून दिला आहे. "ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्‌' अर्थात पृथी, पाताळ, स्वर्ग, अन्‌ एवढेच नव्हे, तर संपूर्ण ओमकाररूपी ब्रह्मांड व्यापले आहे, अशी महती असलेल्या गणरायाने इं?रनेटही व्यापले आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये!

- मारुती राऊत

maruti.raut@rediffmail.com

No comments:

Post a Comment