Saturday, 10 December 2011

आदरणीय सर,


तुमच्याच शाळेत शिकतो माझा मुलगा.

लहानच आहे अजून, निदान माझ्यासाठी तरी,

सहलीला जाण्याचा आनंद मनात न मावण्याइतका तर नक्कीच.

कालपर्यंत तो तेव्हढाच खुश होता. अगदी तुमच पत्र माझ्या हातात देईपर्यंत.

पत्र कसलं एक साधासा अर्ज होता.

सहलीला जाउ ईच्छिणार्‍या मुलांच्या पालकांनी भरायचा.

फारसा मजकूर नव्हताच त्यात. फक्त एव्हढच लिहिलं होतं

"सहलीसाठी निघाल्यापासून ते परत येईपर्यंत, मुलाची कुठलीही जबाबदारी शाळेची नसेल. पालकांनी आपल्या जबाबदारीवर मुलांना पाठवावे"

मी सही करणारच होतो, खरं तर न वाचताच.

कारण तुमच्यावर आणि शाळेवर विश्वास आहे माझा.

पण या वाक्याचा अर्थच कळेना.

आमचं मूल ही आमचीच जबाबदारी आहे सर. अगदी आम्ही जिवंत असेपर्यंत.

पण ज्या विश्वासाने आम्ही त्यांना तुमच्या शाळेकडे सोपवलय त्याचं काय ?

त्या दिवशी तुम्ही त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेउ शकत नसलात तर आम्ही कोणाच्या जबाबदारीवर पाठवायचं त्यांना ?

त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर पाठवावा इतका मोठा नाहीये हो तो अजून.

मी हे जाणतो सर, की एव्हढ्या सगळ्या मुलांना अनोळखी ठिकाणी कानात वारं भरल्यागत हुंदडताना आवरणं अवघड असतं.

पण आमच्या मुलांइतकाच आम्ही तुमच्या अनुभवावरही विश्वास ठेवतो.

काय कराव ते कळत नव्हत सर, पण न कळताही सही करावीशी वाटली. मुलाच्या डोळ्यातले भाव बघून.

लहान मुलांच जग जास्त मोठ नसतं हो. त्यांचे आनंदही त्यांच्या रुसव्याइतकेच क्षणिक असतात. पण तुमच्या माझ्या अनंदांपेक्षापेक्षा ते खूप खरे असतात.

मी त्याला जवळ घेतलं, त्याला समजवणं खूप कठीण वाटलं मला.

"बाबा, तूला काळजी वाटतेय का रे माझी?" त्याने विचारलं

"हो रे बाळा. तिकडे तुझ्याकडे लक्ष कोण देणार?"

"ठीक आहे. मग नाही जात मी. पण टिचरला तू सांगशील?"

मी रडता रडता हसलो. देवाशप्पथ सांगतो सर, जास्त मोठा नाहीये तो. पण त्याक्षणी तो मला माझ्यापेक्षाही मोठा वाटला.

तुमचे खूप खूप आभार सर. मुलांची जबाबदारी न घेउन तूम्ही त्यांनाच जबाबदार व्हायला शिकवताय.
 आंतरजालावरून साभार

No comments:

Post a Comment