गोंविदाग्रज , उर्फ राम गणेश गडकरी यांनी पानिपताच्या या रणसंग्रामावर अंगावर काटा उभा राहील असा फटका लिहिला . द्वापरकाळात कौरव – पांडवांच्या झालेल्या लढाईशी कलियुगातील पानपताशी त्यांनी तुलना केली आहे . हा फटका जसाच्या तसा ….
( चाल: भल्या माणसा , दसलाखाची.)
कौरव -पांडव-संगर-तांडव द्वापर-काली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥ धृ.॥
जासुद आला कथी पुण्याला – ” शिंदा दत्ताजी पडला ;
कुतुबशहानें शिर चरणानें उडवुनि तो अपमानियला । ”
भारतवीरा वृत्त ऐकतां कोप अनावर येत महा
रागें भाऊ बोले , ” जाऊ हिंदुस्थाना , नीट पहा.
‘ काळा ‘ शी घनयुध्द करुं मग अबदल्लीची काय कथा ?
दत्ताजीचा सूड न घेतां जन्म आमुचा खरा वृथा. ”
बोले नाना , ” युक्ती नाना करुनी यवना ठार करा ;
शिंद्यांचा अपमान नसे हा ; असे मराठया बोला खरा. ”
उद्गीरचा वीर निघाला ; घाला हिंदुस्थानाला ;
जमाव झाला ; तुंबळ भरला सेनासागर त्या काळा.
तीन लक्ष दळ भय कराया यवनाधीशा चालतसे ;
वृध्द बाल ते केवळ उरले तरुण निघाले वीररसें.
होळकराचे भाले साचे , जनकोजीचे वीर गडी ,
गायकवाडी वीर अघाडी एकावरती एक कडी.
समशेराची समशेर न ती म्यानामध्यें धीर धरी ;
महादजीची बिजली साची बिजलीवरती ताण करी.
निघे भोसले पवार चाले बुंदेल्यांची त्वरा खरी ;
धीर गारदी न करी गरदी नीटनेटकी चाल करी.
मेहेंदळे अति जळी अंतरी विंचुरकरही त्याचपरी ;
नारोशंकर , सखाराम हरि , सूड घ्यावया अशी धरी.
अन्य वीर हे किती निघाले गणना त्यांची कशी करा ?
जितका हिंदू तितका जाई धीर उरेना जरा नरां.
भाऊ सेनापती चालती विश्वासातें घेति सवें ,
सूड ! सूड !! मनिं सूड दिसे त्या सूडासाठी जाति जवें.
वीररसाची दीप्ती साची वीरमुखांवर तदा दिसे ;
या राष्ट्राचे स्वातंत्र्याचे दृढस्तंभ ते निघति असे.
वानर राक्षस पूर्वी लढले जसे सुवेलाद्रीवरती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥ कौ. १ ॥
( २ )
जमले यापरि पानपतावरि- राष्ट्रसभा जणुं दुसरि दिसे ;
वीर वीरमदयुक्त सभासद सेनानायक प्रतिनिधिसें.
अध्यक्ष नेमिले दक्ष भाउ अरि भक्ष कराया तक्षकसे ;
प्रतिपक्षखंडना स्वममंडना ; तंबू ठोकिती मंडपसे.
शस्त्रशब्द हीं सुरस भाषणें सभेंत करिती आवेशें ;
रणभूमीचा कागद पसरुनि ठराव लिहिती रक्तरसें.
एका कार्या जमति सभा या , कृति दोघींची भिन्न किती !
बघतां नयनीं वाहतीलची पूर अश्रूंचे स्वैरमति
पूर्ववीरबल करांत राहे , आहे सांप्रत मुखामधी ;
हाय ! तयांचे वंशज साचे असुनी झालों असे कुधी !
जमले यापरि पानपतावरि भारतसुंदरिपुत्र गुणी
युध्द कराया , रिपु शिक्षाया , संरक्षाया यशा रणी ॥ कौ. २ ॥
( ३ )
अडदांड यवन रणमंडपिं जमले ; युध्दकांड येथोनि सुरु.
करिती निश्चय उभयवीर रणधीर ” मारुं वा रणीं मरुं ”
पुढें पडे दुष्काळ चमूंमधि अन्न व खाया वीरांना ;
म्हणती , ” अन्नावांचुनि मरण्यापेक्षा जाऊं चला रणा. ”
मग सेनेनें एक दिलानें निश्चय केला लढण्याचा ;
स्वस्थ होळकर मात्र नीचतर पगडभाई तो यवनांचा.
परधान्यहरणमिष करुनि रणांगणि पढले आधीं बुंदेले ;
श्रीशिवराया युध्द पहाया हांक द्यावया कीं गेले ?
धन्य मराठे ! धन्य यवन ते रणांगणांमधिं लढणारे !
आम्ही त्यांचे वंशज केवळ हक्कांसाठी रडणारे
आवेश प्रवेशे दोन्ही सैन्यामधें कराया युध्दखळी ;
परि स्वार्थ अनिवार मार दे , आर्यजनांमधि करि दुफळी.
आर्यजनांचें दैवहि नाचे अभिमानाचें रुप धरी ;
करि वसति मनिं सदाशिवाच्या ; होय अमुच्या उरा सुरी.
सुरासुरी जणुं डाव मांडिला बुध्दिबळाचा भूमिवरी ;
परि दुर्दैवें वेळ साधिली प्यादीं आलीं अम्हांवरी !
कलह माजला , झालि यादवी , नवीन संकट ओढवले ;
कारस्थानीं हिंदुस्थाना व्यापुनि पूर्णचि नागविले .
कुणि यवनांचा बाप जाहला , ताप तयाचा हरावया ,
नवा सोडुनी जया दवडुनी कुणीं लाविल डाग वया.
कुणि दिल्लीची वाहि काळजी , कोणी तख्तासाठिं झुरे ;
कुणा लागला ध्यास प्रीतिचा विचार सारासारिं नुरे.
” लालन लालन ! ” करि कुणि , साधी मर्जीनेची कुणि मरजी ;
असे घसरले , साफ विसरले युध्दरीती अति खडतर जी.
गारदीच मज माफ रुचे जरि यवन न सोडी विश्वासा ;
निजबंधूंची करणी ऐकूनि सोडिं , वाचका , नि:श्वासा !
कलहा करिती काय विसरती क्षुद्र वस्तुच्या अभिमानें ,
जसे हल्लिंचे लोक तोकसम कलहा करिती नेमानें ,
नेमानेमाच्या या गोष्टी कष्टी होतें मन श्रवणीं
असो ; बुडाली एकी , बेकी राज्य चालवी वीरगणीं
सरदारांच्या बुध्दिमंदिरा आग लागी कलहाची
शिपाइभाई परि नच चळले ; रीति सोडिली न मर्दाची.
नाहीं लढले , लढणारहि नच कुणी पुनरपि या जगती ;
तसे मराठे गिलचे मोठे कलिंत लढले पानपती ॥ कौ. ॥ ३॥
( ४ )
एके दिवशी रवि अस्ताशी जातां झाला विचार हा -
” प्रात:काली स्मरुनी काली युध्द करुं धनदाट महा. ”
निरोप गेला बदशहाला , ” युध्द कराया उद्यां चला ;
समरांत मरा वा कीर्ति वरा जय मिळवुनि आम्हांवरि अचला. ”
सकल यामिन आर्यवाहिनी करी तयारी लढण्याची ;
वीरश्रीचा कळस जाहला परवा न कुणा मरणाची .
परस्परांतें धीर मराठे गोष्टि सांगती युध्दांच्या ,
वीरश्रीच्या शस्त्रकलेच्या जयाजयांच्या अश्वांच्या.
बोले कोणी , ” माझा न गणी वंशचि मृत्यूभयासिं कधी ;
आजा , पपजा , बापहि माझा पडला मेला रणामधीं.
बापसवाई बेटा होई खोटा होइल नेम कसा ?
पोटासाठी लढाइ नच परि मान मिळविण्या हवा तसा ! ”
कुणी धरी तलवार करीं तिस पाहुनि आनंदें डोले ,
फिरवी गरगर करि खालीं वर वीर मराठा मग बोले -
” अफाट वाढीची ही बेटी मोठी झाली लग्नाला
प्राणधनाचें द्याज घेउनी उद्यांच देइन यवनाला. ”
अशी चालली गडबड सगळी निद्रा कोण नच आली ;
कोठें गेली अशी पळाली रात्र न कोणाला कळली.
प्रभातरुपें ईर्षा आली ; भीति पळाली निशामिषें ;
भय मरणाचे कैचें त्यांना ? काय करावें हरा विषे ?
शिंग वाजलें संगरसूचक कूच कराया मिळे मुभा ;
धांवति नरवर समरभूमिवर ; राहे धनगर दूर उभा
हटवायातें देशदरिद्रा मुखा हरिद्रा लावुनिया ,
कीर्तिवधूतते जाति वराया समरमंडपीं धांवुनिया.
शहावलीचा हलीसारखा अताइ नामा पुत्र बली
यवनदलीं मुख्यत्व घेत कीं पापावलिमधिं जसा कली ,
प्रणव जसा वेदांस सदाशिव तसा आर्यबलसेनानी ;
विश्वासातें पाहुनि वदनीं अंगुलि घातलि यवनांनी.
आले यापरि रणभूमीवरि ; जसे जात कवि यापुढतीं
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥ ४॥
( ५ )
वाढे जैसा दिवस , वाढलें युध्द तसें अतिनिकरानें
हातघाइला लढाइ आली ; अंबर भरलें नादानें.
उभय वीरवर गर्जति ‘ हरहर ‘, ‘ अल्ला अकबर ‘ उल्हासें ;
भासे आला प्रळय ; यमाला दिली मोकळिक जगदीशें.
अश्ववीरगज भक्तमंडळी गोंधळ भारतदेवीचा ;
तलवारींच्या दिवटया केल्या ; सडा घातला रक्ताचा.
धूळ उडाली गुलाल झाली ; ” उदे ” गर्जती भक्तबळी ,
परस्परांचे बळी अर्पिती भूमि तर्पिती शिरकमळी ,
रणवाद्य भंयकर भराड वाजे शुध्द न कोणी देहाची ;
रणमदमदिरामत्त जाहले , हले फणाही शेषाची.
मनुजेंद्रयरा जणुं अंत न उरला देवेंद्राची नच परवा
म्हणुनि धूलिकण नभीं धाडुनी मेघसंघ कीं रचिति नवा ?
रक्तपाट अतिदाट वाहती घाट बांधिले अस्थीचे ;
मृतगजतुरंग मकर खेळती कृत्य अगाधचि वीरांचें.
घोर कर्म हें बघुनी वाटे रविहि धरी निजसदनपथा ;
कांपे थरथर स्थीर न क्षणभर ; इतरांची मग काय कथा !
यापरि चाले लढाइ ; भ्याले दाढीवाले , मग हटले ;
पळती , धांवति सैरावैरा ; आर्यवीर त्यांवरि उठले.
आर्यजनां आवेश नावरे ; भरे कांपरें यवनाला ;
म्हणति ” मिळला जय हिंदूला लढाइ आली अंताला ! ”
तोंच अताई दूरदृष्टिचा धीर देत निजसैन्याला ,
स्वयें धांवला , पुढें जाहला , स्फूर्ति पुन्हां ये यवनाला.
त्वरित पूर्ववत् समर चाललें , हले भरंवसा विजयाचा ;
दाढी शेंडी एक जाहली खेळ शहाच्या दैवाचा.
करी अताई जबर लढाई नाहीं उपमा शौर्याला ;
त्यावरि ये विश्वास , भासलें कीं खानाचा यम आला !
विश्वासानें अतिअवसानें खान पाडिला भूमिवरी
करिवरचरणीं मरण तया ये , शरश एक मग यमनगरी ,
धीर सोडिती पीर शहाचे पळती आवरती न कुणा ;
शहावलीची कमाल झाली यत्न तयाचा पडे उणा.
पहात होता शहा खेळ हा दुरुनी , तोही घाबरला ,
म्हणे , ” करावें काय ? न ठावें ! ” दैव हात दे परि त्याला.
दक्ष वीर लक्षैकधीर तनुरक्षक सेनेसह धावे ;
म्हणे चमूला , ” पळति यवन ये कंठ तयांचे छेदावे. ”
पुन्हा उलटले यवन लढाया हुकुम ऐकतां छेदावे. ”
शहा तयातें सहाय होतां मारा करितो जोराचा.
जसे लढावे वीर संगरीं कविज्ञन इच्छा मनिं करिती ,
तसे मराठे गिलचे याचे कलींत लढलें पानपती ॥ कौ. ॥ ५ ॥
( ६ )
नभोमध्यगत सूर्य होत मग युध्दहि आलें मध्याला ;
हाय ! हाय ! या आर्यभूमिचा भाग्यसूर्य तो शेवटला !
सदा अम्हांला विजय मिळावा , प्रताप गावा जगतानें !
सदाशिवाचा उजवा बाहू राहु रिपुस्त्रीमुखविधुचा ,
बाऊ केवळ म्लेंच्छजनांचा , भाऊ माधवरायाचा ,
बेटा ब्राह्मण बादशहाचा ; पेटा साचा वाघाचा ,
वीरफुलांतील गुलाबगोटा , वाली मोठा धर्माचा ,
ताण जयाची द्रौणीवर उद्राण आणितां आर्याला ,
विजयाचा विश्वास असा विश्वास – लागला शर त्याला !
मर्म हाणि तो वर्मी लागे कर्म आमुचें ओढवलें ;
धर्म-सभेला आत्मा गेला , धर्मवधूकरिं शव पडलें.
अश्रू नयनीं आणि लक्ष्मी प्रिय भार्या त्या आर्याची ;
उत्तरे चर्या , अघा न मर्या , परि ये स्मृति तिस कार्याची.
करी विचारा वीराचारा दारा वीराची स्वमनीं -
” नाथघात सैन्यांत समजतां धीर उरेल न आर्यजनीं. ”
छातीचा करि कोट , लोटिला दु:खलोट अनिवार जरी ,
नीट बैसवी प्रेता देवी धुनष्य त्याच्या दिलें करी.
धन्य सती ती ! धन्य तिचा पति ! धन्यचि जननीजनकाला !
धन्य कवीचें भाग्य असे या म्हणुनि मिळे हें गायाला !
परि जें घडलें लपले कुठलें ? वेग फार दुर्वार्तेला ;
अल्पचि काळें भाउस कळलें – ” गिळिलें काळानें बाळा ! ”
” हाय लाडक्या ! काय कृत्य हें ? घाय काय हा भान करी
गोंडस बाळा , तोंड पुण्याला दावुं कसें ? कथिं तोड तरी , ”
असा करी ती शोक ऐकुनी दु:ख जाहलें सकळांला
अश्वावरती स्वार जाहला भाऊराया मरण्याला.
व्यंग समजतां भंग कराया आर्याच्या चतुरंग बळा
सिध्द जाहला शहा ; तयाला देवानें आधार दिला.
फिरति मराठे आला वाटे अंत शिवाजीराज्याला ;
भाऊराया योजि उपाया – तोही वायां परि गेला.
मान सोडिला , साम जोडिला ; दूत धाडिला होळकरा ;
प्रसंग येता मत किंकरा धनी जोडिती असे करां.
दूर निघाला. सत्वर आला , होळकरांला नमन करी ;
म्हणे , ” भाउचा निरोप एका – ‘ साह्य करा या समयिं तरी.
उणें बोललों , प्रमत्त झालों , बहु अपराधी मी काका ;
माफ करा , मन साफ करा , या आफतींत मज नच टाका.
मत्प्राणाची नाही परवा बरवा समरी मृत्यु हवा ;
परी लागतो डाग यशाला शिवरायाच्या तो दुरवा.
देशकार्य हें व्यक्तीचें नच ; सक्ति नको ; भक्तीच हवी ;
आसक्ती सर्वांची असतां मिळवूं आतां कीर्ति नवी.
राग नका धरु ; आग लागते यशा ; भाग हा सर्वांचा ;
शब्द मुलाचा धरितां कैचा ? हाच मान का काकाचा ?
साह्य कराया यवन बधाया धीर द्यावया या काका ! ”
असें विनविलें , हात जोडिले , दया न आली परि काका.
रट्टा दे भूमातेला ; धरि कट्टा वैरी मान तिची
बट्टा लावी वयास ; केली थट्टा ऐशा विनतीची ;
दु:खावरतीं डाग द्यायला करी होळकर हुकूम दळा -
” पळा , मिळाला जय यवनाला! ” काय म्हणावें अशा खळा ?
फिरले भाले-भाले कैचे ? दैवचि फिरलें आर्यांचें ;
पाहे भाऊ , वाहे नयनीं नीर ; करपलें मन त्याचें.
निरोप धाडी पुन्हा तयाला – ” पळा वांचवा प्राण तरी
पळतांना परि कुटुंबकबिला न्यावा आमुचा सवें घरीं ”
घेत होळकर वीरवधूंतें ; मग दक्षिणची वाट धरी ;
देशहितांची करुनी होळी नाम होळकर सार्थ करी !
करी दुजा विश्वासघात हा ; निजबंधूंच्या दे साची
परवशतेची माथीं मोळी , हातीं झोळी भिक्षेची !
काय कथावी युध्द-कथा ? मग वृथा भाउचा श्रम झाला ;
धीर सोडुनी पळति मराठे , पूर्ण पराभव त्यां आला.
कोणी वेणीमाधव धांवे ; वार तयाचा शिरीं जडे ;
भारतरमणीकंठतन्मणी धरतीवरतीं झणी पडे.
भूदेवीची तुटे गळसरी ! फुटे दैव कीं आर्यांचे
आकाशाची कुऱ्हाड पडली ; कडे लोटले दु:खाचे !
सैरावैरा आर्य धावती ; हरहर ! कोणी नच त्राता !
यवन करिति ज्या मग प्रळय भयंकर: वदा कशाला तो आतां ?
वर्णन करितां ज्या रीतीनें कुंठित होइल सुकविमति ,
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥ ॥ ६ ॥
( ७ )
सन सतराशें एकसष्ट अतिनष्ट वर्ष या देशाला
हर्ष मरे , उत्कर्ष उरेना ; सकळां आली प्रेतकळा.
फुटे बांगडी दीड लाख ती ; राख जहाली तरुणांची
आग पाखडी दैव अम्हांवर ; मूर्ति अवतरे करुणाची .
घरोघरीं आकांत परोपरि ; खरोखरीचा प्रळय दिसे ;
भरोभरीं रक्ताच्या अश्रू अबला गाळिती शोकरसें.
‘ दोन हरवली मोति ; मोहरा गेल्या सत्तावीस तशा ;
रुपये खुर्दा न ये मोजितां ‘ – वचना वदती वृध्द अशा ;
धोर वृत्त हें दूतमुखानें कानीं पडलें नानाच्या ;
‘ भाऊ भाऊ ‘ करितां जाई भेटिस भाऊरायाच्या.
उघडा पडला देश तयातें हें नव संकट कां यावे !
दु:ख एकटें कविं न येत परि दु:खामागुनि दु:ख नवें !
धक्का बसला आर्ययशाला ; तेथुनि जाई राज्य लया ,
रघुनाथाचें धैर्य हरपलें , जोड उरेना हिमालया.
” नाथ ! चाललां सोडुनि अबला ! पाहूं कुणाच्या मुखाकडे ? ”
” वाळा ! कैसा जासि लोटुनि दु:खाचे मजवरतिं कडे ? ”
जिकडे तिकडे हंबरडे यापरी परिसती जन फिरतां ;
कोणिकडेही तरुण दिसेना ; सेनासागर होय रिता.
उडे दरारा , पडे पसारा राज्याचा ; बळ घेत रजा ;
उघडें पडलें मढें हत्तिचें कोल्हे त्यावरि करिती मजा !
भलते सलते पुढें सरकले , खरे बुडाले नीच -करीं.
मालक पडतां नीट बैसले पाटावरती वारकरी.
नडे आमुची करणी आम्हां ; ! खडे चारले यवनांनी ;
तडे पडोनी यशपात्राला रडे सदोदित भूरमणी.
गंजीफांचा डाव संपला दिली अखेरी यवनांते
स्वातंत्र्यासह सर्वस्वातें दूर लोटिलें निज हातें.
रुमशामला धूम ठोकितां पुणें हातिचें घालविलें ;
दुग्धासाठी जातां मार्गी पात्र ठेवुनी घरिं आले !
करि माधव नव उपाय पुढतीं परि ते पडती सर्व फशीं ;
परिटघटी उघडिल्या एकदा बसेल कैशी पुन्हा तशी ?
जसा नदीचा ओघ फिरावा पात्रीं पडतां गिरिशिखरें
पानपताच्या पर्वतपातें इतिहासाचा ओघ फिरे.
इतिहासाचें पान येथचें काळें झालें दैवबळें ,
या देशावर अपमानाची स्वारी दु:खासहित वळे.
सर्वस्वाचा नाश जयाने वर्णु तयातें अतां किती ?
व्यास वर्णितां थकले यातें मग मी कोठें अल्पमति ?
जसें झगडतां त्वरित फिरावी सकल जगाची सरळ गति
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥ ७ ॥
( ८ )
जें झाले ते होउनि गेलें फळ नच रडुनी लेशभरी ;
मिळे ठेंच पुढल्यास मागले होऊं शहाणे अजुनि तरी.
पुरें पुरें हे राष्ट्रविघातक परपस्परांतिल वैर अहो !
पानपताची कथा ऐकुनी बोध एवढा तरि घ्या हो !
भारतबांधव ! पहा केवढा नाश दुहीने हा झाला !
परस्परांशी कलहा करितां मरण मराठी राज्याला.
हा हिंदू , हा यवन , पारशी हा , यहुदी हा भेद असा ,
नको नको हो ! एकी राहो ! सांगू आपणां किती कसा ?
एक आइचीं बाळें साचीं आपण सारे हें स्मरुनी ,
एकदिलानें एकमतानें यत्न करु तध्दितकरणीं.
कथी रडकथा निजदेशाची वाचुनि ऐसा हा फटका
लटका जाउनि कलह परस्पर लागो एकीचा चटका !
कौरवपांडव- संगरतांडव द्वापरकालीं होय अती ;
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥ ८ ॥
(www.ramganeshgadkari.com वरून साभार)