Friday, 28 October 2011

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा........!

 

दिवाळीसाठी सगळ्या पणत्या सजल्या सवरल्या होत्या
त्या एक साधी पणती होती..... तपकीरी रंगाची
ना रंग , ना आकर्षण... बाकीच्या पणत्यांच्या तुलनेत अगदी साधी
दिवाळीच्या दिवशी सगळ्या पणत्या एका जागेवर आणून त्या पेटवल्या
मग सगळ्या पणत्यांना व्यवस्थीतपणे त्यांच्या जागवर रचले गेले...
कुणाला देवघराजवळ, कुणाला तुळशीजवळ, कुणाला रांगोळीत ........
पण त्या तपकीरी पणतीला मात्र घरामागे एक पडलेला भाग होता तेथे नेवून ठेवले
तेथे ना आडोसा होता ना जळते आहे का विझली हे पहायला कुणी...
त्या पणतीला फार वाईट वाटले... तीच्या सोबतच्या पणतया बद्द्ल असूया वाटली..
आपल्या नशीबाचा राग आला तीला.....
ती जळत आहे का उजळत आहे हेचं तीला कळेनासे झाले....
तीथे बाजूला एक केरसुणी होती ती केव्हा पासून पणतीचे निरीक्षण करत होती..
ती म्हणाली " काय झाले " पणतीने सगळी हकीकत सांगीतली
ती राहून तीला म्हणाली " तुला नाही वाटत का तु चुकीचा विचार करत आहे "
"
कसे काय बरं ...?" पणतीने विचारले
केरसुनी म्हणाली " अरे तुझ्या सोबतच्या पणत्या जेथे जळत आहे तेथे त्या जळून काहीचं उपयोग नाही
कारण तेथे उजेड आहे म्हणून त्यांचे वेगळे असे अस्तित्व नाही आहे तेथे ना त्यांची तेथे गरज आहे
पण तु जेथे जळत आहे येथे फक्त तुझेचं अस्तित्व आहे ... खरा प्रकाश तु देत आहे...."
येथे तुझ्या प्रकाशाची गरज आहे ....अरे तु ज्यासाठी आहे तु तेचं करत आहे
तुझा खरा उपयोग होत आहे............. "
पणतीने आसपास पाहीले सारे काही प्रकाशमान होते...
ती हसली आणि परत जळाय ऐवजी आनंदाने उजळून निघाली....
आपले ही असेचं काही असते.........
काय वाटते तुम्हाला ?????????
विचार करा...........
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा........!
तुमचे पण जीवन अंतरीच्या उर्जेने उजळून निघो ......
हिचं सदिच्छा.............!
आंतरजालावरून साभार

पुन्हा कधी येईल हो दिवाळी ..??



दिवाळी येणार ...दिवाळी येणार ...म्हणता म्हणता दिवाळी उद्यावर येवून ठेपली आहे ..दिवाळी म्हणजे सणांची महाराणी ...प्रकाशाचा उत्सव ...आनंदाचा , उत्साहाचा सण...आठवणींचा सण ....!!

... ...
आठवणीची पाने उलगडताना मन बालपणात जरा जास्तच रेंगाळते ...बालपणाची दिवाळी आठवते

आम्ही भावंड खूप वाट पाहायचो दिवाळीची ...नवीन कपडे मिळणार ...फटाके वाजवायला मिळणार ...अन तो दिवस यायचा ..आता दिवाळी फक्त एक दिवसावर ....तिन्हीसांजा व्हायच्या अगोदर आम्ही भावंडानी वहिचे कागद अन बांबू यापासून तयार केलेला कंदील लावलेला असायचा ... आजी (आई ची आई) आलेली असायची ...कधी रात्र सरते अन ती पहाट उगवते अस व्हायचं ...आजीच्या मांडीवर पडून गोष्ट ऐकता ऐकता कधी झोप लागायची कळायचच नाही ..लवकर उठेल त्याला माझ्याकडून एक रुपया हे आईन सांगितलेलं असायचं....सगळ्या गावाच्या अगोदर उठून आपणच अगोदर फटाके वाजवायचे हा बेत ठरलेला असायचा ...नवीन आणलेल्या कपड्यांना तांब्याच्या तांब्यात गरम निखारे घालून पुन्हा एकदा कडक इस्त्री करायची हे ओघाने आलंच..अन ती पहाट यायची ...सर्वांच्या अगोदर मीच उठायचो ..कारण आई चीटिंग करायची ......मलाच उठवायची कारण मला मिळणारा एक रुपया पुन्हा मी आईकडेच साठवण्यासाठी द्याचो ...मी गुपचूप उठायचो ..पण आमच्या अगोदर गावातल्या कोणीतरी फटाके वाजवलेले असायचे ..अर्र्र खूपच उजाडलं ..उशीर झाला ..मन किंचित बावर व्हायचं ...मग आम्ही सगळी भावंड एकापाठोपाठ उठायचो ......भरभर दात घासून न्हाणी मध्ये अंघोळीला जायचं ..आई चंदनाच्या सुगंधी साबणाने अंघोळ घालायची ... सुगंधी तेल डोक्याला लावायची ..नवे कपडे घालायची ..कुंकवाचा ओला टिळा आम्हाला लावायची ...देवाच्या पाया पडायला लावायची ...आम्ही पण देवापुढे ओळीने उभे राहून नतमस्तक व्हायचो ...तोपर्यंत आईने गरम दुधाचा कप पुढ्यात ठेवलेला असायचा ..तो फुर्रर करत पिताना नजर मात्र आईवर खीळायची ..तिची लगबग चालूच असायची ...कितीही कामाने थकली तरी तिचा चेहरा प्रसन्न......नाकात नथ....गळ्यातल्या पुतळ्या ...हातातली काकण ..अन तिची लगबग....


मग हातात फटाक्याने भरलेली पिशवी अन अगरबत्ती , माचीस घेवून निघणार इतक्यात पुन्हा आईची हाक....

''
चकली , करंज्या खावून जायचं सगळ्यांनी .. सणासुदीला खाल्ल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये..''चुलीमध्ये लाकूड सारत, धुरामुळ डोळ्यातून येणार पाणी पुसत, भाकरी थापत आई खाण्यासाठी आग्रह करायची

'' नको आई ..नंतर खातो
''

''
मग कशाला केलं मी हे सार ..?''मग आईच्या आग्रहाखातर गडबडीत सार बकाबका ,उभ्याउभ्या खायचं ...सार लक्ष फटाक्याकडे...पुन्हा गडबडीन निघायचं ..आईन दरवाजासमोर शेनान सारवून त्यावर काढलेल्या रांगोळीवर पाय पडणार नाही याची काळजी घायची अन गावच्या मंदिराकडे धूम ठोकायची ...सारे मित्र , गावातली मुल आपापले फटाके घेवून आलेली असायची ...मग दे धडाका ..मज्जाच मज्जा ...डब्बा अन त्याखाली मोठा फटाका लावायचा अन उडणारा डब्बा पाहायचा हे तर आमच्या आवडीच ....दिवाळीची लगबग एक महिना अगोदरच सुरु झालेली असायची ...घराची साफसफाई , भातकापणी , हि दिवाळीतील काम ..आई एकटी तरी किती उरकणार ...मग आम्ही भावंड तिच्या मुली बनायचो ..घरातल सार काम करायचो ..कुणी भांडी घासायचं ...कुणी पाणी भरायचं ..कुणी कपडे धुवून आणायचं...आम्ही भावंड मोठे झालो ..कमावते झालो ...आई सत्तरीत पोहोचली , नातवंडात रमू लागली तरी अजूनही तिची लगबग तशीच ...तिच्या लेकरांची ओढ फक्त तिलाच ...त्यांच्यासाठी झिजायाच तिलाच ठाऊक ....मुलांच्या flat मध्ये gas च्या चुली आल्या तरी आईची मातीची चूल अजूनही तशीच ...जग बदललं..आई मात्र तशीच ...दिवाळीतल्या प्रकाशासारखी ....पहाटेच्या अंधारात तेवणाऱ्या पणती सारखी
..खूप न्यार होत सार ....दगडान टिकल्या फोडण्याची मज्जा न्यारीच होती ...साला सध्याचा पाच हजाराच्या माळेन अन त्या धुरान जीव गुदमरतो हो ....


गेले ते दिवस ....रेडीमेड कंदील आणायचा
रेडीमेड फराळ आणायचा
रेडीमेड कपडे आणायचे ...सार रेडीमेड झालय.....कृत्रिम ....वापरा अन फेका ...दिवाळी कधी येते अन कधी जाते काही कळतच नाही
.

.
मागे पण एकदा असच झालं
ती येणार म्हणून चुकार पावसाने पण नुकतीच हजेरी लावली होती .....तिला पाहण्यासाठी आकाशात मेघ पण दाटले होते .....शेतात उगवलेले डौलदार भातपीक पण वरून उडणार्या पाखरानबरोबर डोलत होती ...स्वच्छ सोनेरी उनाच नव वस्त्र नेसून झाड फुल पान चकाकत होती ...अन ती आली ...तिच्या स्वागतासाठी घराची दार पणत्यांच्या रांगांनी उजळली....अंगण रांगोळ्यांनी फुलली ...दारावरची तोरण आकाश दिव्याच्या प्रकाशान दिपून गेली .....नवी कोरी वस्त्र , पैठणी अत्तराच्या गंधान मह्कून गेली ...पण....सूर्य पश्चिमेला झुकला ...तिन्हीसांजा झाल्या ...अन ती निरोप घेवू लागली ...मन कावरबावर झाल ...मनापासून वाटलं अजून तीन थोड थांबाव...तिच्या सोबतीत वेगळच चैतन्य भासलं ...तिच्या सहवासातले दोन दिवस कसे गेले काही कळलच नाही ...आता रात्रीच्या अंधारात ती गडप होणार ....ते चैतन्य हरवणार ...म्हटल तिला आज विचारावच ....पुन्हा ती भेटेल ..??उद्याचा काय भरवसा
....??तिला थांबवलं ..आज ती हि थांबली ...तिला सुद्धा मनमोकळ करायचाच होत वाटततिला विचारलं ...'' का ...का घाई एवढी जायची ?? का थांबावस वाटत नाही तुला ?? का चाललीस यावेळी लगेचच ..?? आम्ही तुझ्यासाठी एवढी तयारी करतो ...अन तू निघालीस ??''...ती उत्तरली ..
''
कसली तयारी ?? .माझ अप्रूप आता उरलच नाही ...रोजचीच खरेदी ...रोजचच गोडधोड विकतच ...शुभेच्छा कार्डचा जमाना गेला sms आला ...कापलेल्या कागदाचा शाबुदाण्याच्या खळीन आकाशदिवा तयार व्हायचा ...आता कोण करतो ?? विकत मिळू लागला ...अंगणातल्या किल्ल्यासाठी मातीन माखलेले हात आता दिसत नाहीत ...रेडीमेड चा जमाना ..तेलात भिजलेल्या मातीच्या पणत्या लुप्त झाल्या ..चकाकत्या प्लास्टिकच्या पणत्या आल्या ...सार विकतच झालाय...आता आनंद विकत मिळू लागलाय...तुम्ही कृत्रीमतेत हरवला आहात ..कृत्रिम हसन ,.कृत्रिम रडण. कृत्रिम आनंद ...खोट्या स्वप्नाच्या मागे धावू लागलेय गर्दी ....थोड थांबा ..मागे वळून पहा ..खरा टिकाऊ आनंद कशात मिळतो त्याचा शोध घ्या ...''...
अस बोलून ती गडद अंधारात गडप झाली ...त्या अंधारापर्यंत पणती चा प्रकाश हि पोहचलाच नाही .आता पुन्हा कधी येईल हो दिवाळी ..??
गोरख जाधव (सातारा)