त्या दिवशी ‘तो’ आपल्या एका मित्राला घरी जेवायला घेऊन आला. तो असा अचानक एक पाहुणा आणणार आहे, हे त्याने तिला फोन करून सांगितलेही नव्हते. अगदी जेवणाच्या वेळी ‘तो’ आल्याने तिची खूप गडबड उडाली. पुन्हा भाताचा कुकर लावायला लागला. भाजी करावी लागली. मनातून ती खूप चिडली होती; पण त्या मित्राच्या समोर तिने राग दाखवला नाही. त्याला आग्रहाने जेवायला वाढले. वहिनींची चौकशी केली. मित्र निघून गेल्यानंतर मात्र ती ‘त्याच्या’ बेजबाबदारपणाबद्दल खूप बोलू लागली. ऐनवेळी उडालेल्या धांदलीचा सर्व राग तिच्या बोलण्यातून बाहेर पडत होता. सुरुवातीला ‘त्याने’ही काही कारणे देण्याचा प्रयत्न केला; पण नंतर तो शांत राहिला. तिचे बोलून झाल्यानंतर ‘त्याने तिच्या खांद्यावर हळुवार हात ठेवला आणि म्हणाला, ‘सॉरी, चुकलं माझं, चल तू जेवून घे. मी वाढू का तुला?’ त्याच्या या वाक्यानं आणि प्रेमळ स्पर्शानं तिचा सगळा राग कुठल्या कुठं निघून गेला. तिनं डोळे पुसले. ती मनापासून हसली आणि आपल्या जेवणाची तयारी करू लागली.
असं का घडतं?
बहुसंख्य स्त्रिया स्पर्शाची भाषा जाणतात. त्यामुळेच दोन मैत्रिणी एकमेकींना भेटल्या की, एकमेकींचा हात हातात घेतात. एखादे गोंडस बाळ दिसले की, त्याला उचलून त्याची पप्पी घेतात. तिची त्वचा त्याच्या त्वचेपेक्षा अधिक पातळ आणि संवेदनशील असते. त्याला स्पर्शाची भाषा वगैरे समजणे थोडे कठीणच, तिला मात्र स्पर्शाची भाषा समजते. त्यामुळेच त्याने तिच्या खांद्याला केलेला स्पर्श खरा आहे, त्याला खरच स्वतची चूक जाणवली आहे, हे तिला जाणवलं आणि तिचा राग पळाला. तिच्या, संवेदनशील नाजूक त्वचेला स्पर्शाची अपेक्षा असते. ‘त्याने’ कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेमाने स्पर्श करावा. हातात हात घ्यावा, पाठीवर थोपटावे असे तिला वाटत असते. त्यालाही स्पर्शाची भूक असते; पण ती ठराविक कारणासाठीच! असा उगाचच निर्हेतूक स्पर्श त्याच्या लक्षातच राहत नाही; पण तिच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी तो लक्षात ठेवायला हवा.
त्याची दुसरी हुशारी म्हणजे तो पटकन ‘सॉरी’ म्हणाला. आपली चूक मान्य करतो तो आदर्श माणूस; पण चूक नसतानाही सॉरी म्हणतो तो आदर्श नवरा ! ‘ती’ काही वाद घालू लागली की कोणतेही आग्यरुमेंट न करता ‘सॉरी’ म्हटले की वाद संपूनच जातो, हे आता त्याच्या लक्षात आले आहे. बायकोला ‘सॉरी’ कसं म्हणायचं हा पुरुषी अहंकार बाजूला ठेवला, तर भांडणाच्या प्रसंगाचाही शेवट गोड होऊ शकतो.
- डॉ. यश वेलणकर
No comments:
Post a Comment