Sunday, 11 March 2012

स्वभावधर्म

प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगवेगळा असतो. जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा आपला धर्म, दया दाखविण्याचा, दुसऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा आहे. त्यामुळे इतरांच्या वाईट वागण्याचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे... 

एक दिवस एक साधू नदीवर स्नानास गेला होता. स्नान घेत असताना त्यास एक विंचू पाण्यात पडून गटांगळ्या खाताना दिसला. त्या विंचवास पोहता येत नव्हतं. जीव वाचविण्यासाठी तो करीत असलेली केविलवाणी धडपड पाहून साधूचं मन दवलं. त्याच्या मनात विचार आला, जर आपण विंचवास वाचविले नाही, तर तो नक्कीच बुडणार. त्यामुळे साधूनं त्या विंचवास अत्यंत काळजीपूर्वक उचलून पाण्याबाहेर काढलं आणि नदीच्या काठावर नेऊन खाली जमिनीवर सोडणार तोच त्या विंचवानं साधूच्या बोटाला नांगी मारली. साधूला असह्य वेदना झाल्या, त्यानं एकदम हात झटकला, विंचू जमिनीवर पडला. साधूनं सुटकेचा नि:श्वास सोडला आणि पाण्यात शिरून स्नान घेऊ लागला, थोड्या वेळानं त्याचं लक्ष पुन्हा विंचूच्या दिशेनं गेलं, त्याला दिसलं की, विंचू जमिनीवरून परत एकदा नदीच्या दिशेनं जाऊन पाण्यात पडून धडपडू लागला आहे. साधूला पुन्हा त्याची कीव आली. त्यानं त्यास पुन्हा उचलून पाण्याबाहेर काढलं, आणि पुन्हा तेच, विंचवानं साधूच्या हाताला नांगी मारली... असं हे नाट्य काही मिनिटं चालू होतं.

पाण्यावर येणारी शिकार टिपण्यासाठी तेथून जवळच झाडावर दबा धरून बसलेला शिकारी हे सर्व नाट्य पाहत होता. साधू त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करतोय आणि विंचू त्या साधूला नांगी मारतोय, साधू वेदनेनं विव्हळतोय, तरीही साधू पुन्हा पुन्हा त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करतोय... शिकाऱ्यास हे सर्व पाहून राहवलं नाही. त्यानं साधूला सांगितलं, 'महाराज स्पष्ट बोलतोय म्हणून क्षमा असावी, परंतु, तुम्ही त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करता आणि तो विंचू तुमचे उपकार विसरून तुम्हाला एक सारखा नांगी मारतोय, तुम्हाला वेदना होतात. तुम्ही त्या विंचवाला वाचविण्याचं सोडून का देत नाहीत, त्याला बुडायाचं असेल तर बुडू द्या, मरू द्या नं!'

शिकाऱ्याचा हा शहाणपणाचा सल्ला ऐकून साधूला हसू आलं, त्यानं शिकाऱ्यास सांगितलं, 'माझ्या मुला, तुझ्या बोलण्याचा मला राग आला नाही. पण हे बघ, विंचू मला नांगी मारतोय हे खरं आहे, परंतु, तो द्वेषानं किंवा दुष्ट हेतूनं मला नांगी मारत नाही. जसा पाण्याचा स्वभाव मला भिजविण्याचा आहे, तसा विंचवाचा स्वभाव नांगी मारण्याचा आहे. मी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, हे ते त्याला समजत नाही. ते त्याच्या बुद्धीला उमगण्याच्या पलीकडचं आहे. परंतु जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा माझा स्वभावधर्म त्याला वाचविण्याचा आहे. जर तो त्याचा स्वभावधर्म बदलू शकत नसेल तर मी तरी माझा का बदलावा? माझा धर्म, प्रत्येक प्राण्याला, मग तो मनुष्य असो की जंगली प्राणी, वाचविण्याचा आहे, या छोट्या विंचवाच्या वागण्यामुळे तो का बदलू?'

आपण जगात वावरताना आपणास अनेकांच्या विचित्र वागण्याला तोंड द्यावं लागतं. काही आपल्याला मानसिक इजा करत असतात, काही शारीरिक. काही आपला अपमान करीत असतात, आपण साध्य केलेलं यश काहीजण जाणीवपूर्वक हिरावून घेतात. काहीवेळा आपले सहकारी आपल्या कल्पना चोरतात किंवा आपल्याविरुद्ध बॉसकडे कागाळ्या करतात. काही वेळा आपलेच मित्र, नातेवाईक सहकारी अचानक विश्वासघात करतात. कधी कधी आपल्या पाठीमागे आपल्या विरोधात बोलत राहतात.

हळुहळू आपणास असं दिसतं की, आपण स्वत:च रागानं किंवा वेदनेनं एखादी कृती करीत असतो, आपले शब्द वा विचार व्यक्त करीत असतो. कधकधी आपण सूडबुद्धीनं वागण्याचा विचार करतो. आपल्यावर नकळत नकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो आणि आपण स्वत:चं नुकसान करून घेतो. मनात आणि हृदयात वाईट विचार आणून स्वत:ला इजा करून घेतो. कधी काहीजण कटकारस्थान करून आपल्या यशावर पाणी फेरतात.

आपला धर्म, दया दाखविण्याचा, प्रामाणिकपणे वागण्याचा, दुसऱ्याला मदत करण्याचा, इतरांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, इतरांची काळजी घेण्याचा आहे. इतर काही अज्ञानापोटी, असमंजसपणे, द्वेषानं, स्वाथीर्पणानं, वैरभावानं वागतात. परंतु, त्यांच्या वाईट वागण्याचा, अज्ञानाचा, त्यांच्या सवयीचा, लोभी वृत्तीचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे.


आंतरजालावरून साभार  

इरसाल प्रश्न हटके उत्तरे

 
अनेकदा लोकं असे प्रश्न विचारतात जे अतिशय मुर्खपणाचे असतात...
अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत. पहा काही मस्त नमुने दिले आहेत::

1)हॉटेल मध्ये अनेक जण वेटर ला 'इथे जेवण कसं मिळतं' हे विचारतात....
आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाच एखादा
इरसाल वेटर तर....गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?
वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...
कसला चांगला लागतोय

2)प्रश्न- अरे वा! घरीच आहात वाटतं? उत्तर- नाही माझ्या पश्चात ही इमारत
"राष्ट्रिय वास्तु" घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय

3)सकाळी.प्रश्न - पेपर वाचताय वाटतं!
उत्तर- नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही.

4)सिनेमागृहा बाहेर प्रश्न: काय पिक्चर बघायला आलात वाटतं?
उत्तर: छे! फावल्या वेळात तिकिटे "ब्लैक" करून अर्थार्जन करावं म्हणतोय! पण!
इथेही तुम्ही आमच्या "आधी" हजर!!

5)सकाळी फिरायला निघाला आहात प्रश्न: काय "मोर्निंग वाक्" वाटतं??!!!
उत्तर: काही तरी काय! नगरपालिकेचं कंत्राट घेतलय मैलाचे दगड कुणी पहाटे
चोरून तर नेत नाही ना याची खात्री करतोय!!

6)प्रश्न- प्रवासाला निघालात वाटतं? (हातात लगेज बघून !!!!)
उत्तर- नाही हल्ली व्यायाम करायला सवड मिळत नाही ना!
शिवाय जिम चे पैसे ही वाचतात !!

शिवरायांबाबत जगातील मान्यवरांचे उदगार



मि. अनाल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखे राजे जर आमच्या देशात होऊन गेले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो."

इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना क...ेली."

मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) - "साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."

प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे."

ब्यारन कादा (जपान) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले."

अन्तिनिओ (पोर्तुगीज व्हायसराय) - "छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते."

मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे."

डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) - "स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत." (ग्रान्ड रिबेल)

॥जय जिजाऊ॥जय शिवराय॥जय शंभुराजे॥


आंतरजालावरून साभार 

एकदा वाचून पहाच...



एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती. थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया’त जाऊन पुस्तक वाचत बसली.

तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. शेजारी बिस्किटाचा पुडा होता. तिने एक बिस्कीट खाताच त्यांनीही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले. त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून ति...चा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे हा! माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!’ ती मनात विचार करत होती.

दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. आता शेवटचे बिस्कीट उरले.

“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, का मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’ ती विचार करत होती. “”आता हे अतिच झालं,” असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.

थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली. पाहते तर काय, तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.

आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, याची तिला खूप लाज वाटली. एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर टाकली, तर शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.
(The Cookie Thief - by Valerie Cox)

निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते. दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का? कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात...

भक्ती...


भक्ती म्हणजे नेमकं काय...

दिवसातून दोन वेळा पूजा, आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन देवाचे दर्शन आणि अमुक एक वारी उपवास ...बाकी वेळ दुसऱ्यांचा उपहास, लोकांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल अपशब्द, अहंकार, गर्व आणि अट्टाहास...

ही भक्ती नाही... ही आहे सक्ती...

सगळे करतात म्हणून आपणपण करायची सक्ती...

भक्तीत शक्ती असावी.. सक्ती नाही...

कुंभाराला मग्न होऊन मडक्याला आकार देतांना पहावं... जोपर्यंत मडक्याला हवा तसा आकार मिळत नाही तोपर्यंत कुंभाराचे हाथ त्याला आकार देत असतात... ती खरी भक्ती...

आईला आपल्या लेकराला गोंजारतांना पहावं .. ती खरी भक्ती...

एखाद्या साधूला बेधुंद होऊन अभंग गातांना पहावं.. ती खरी भक्ती...

चिमणीला आपल्या पिल्लांना भरवतांना पहावं.. ती खरी भक्ती...

'मनापासून' केलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे भक्ती..

अहो ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्याला जाऊन तुम्ही 'हे काम झालं तर १ नारळ फोडीन' म्हणून लालूच दाखवता... सृष्टीच्या निर्मात्यालाच तुम्ही चक्क चार भिंतीच्या आत कोंडून ठेवता.. वाह रे माणसा ...

भक्तीच्या सीमा त्या पलीकडल्या आहेत... किंबहुना भक्तीला सीमाच नाहीत...

भक्तीच्या सीमा ठरवायला जातो ना तिथेच आपण फसतो !!!

आंतरजालावरून साभार!!!

कारण तो मोठा झालाय ना......


..

त्याला जन्म देताना तिला वेदना असह्य झाल्या होत्या ....
वेदनेन कळवळून तीन किंकालीच फोडली ....
पण क्षणात तान्हुल्याचा चेहरा पाहून आनंदान देहभानच हरपून गेली ...

त्याच्या मुखातून जेव्हा पहिल्यांदा आई शब्द आला तेव्हा ती कौतुकान ऐकतच राहिली ....
जीभ अडखळत त्याच बोबड बोलन ती सार्यांना ऐकवायची ...

त्यान पहिल्यांदा पाऊल उचललं तो क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा ...
ती पाहतच राहिली ...

तो चिमुकला शाळेतून घरी परतण्याची वेळ झाली कि तिची नजर दरवाजाकडे जायची ...
अन तो आला कि माझ लेकरू आल म्हणून कवटाळायची ......

तीन पतीला सांगितला हवे तर माझे दागिने मोडा...एकवेळ जेवू ...
पण माझ लेकरू चांगल शिकलं पाहिजे ....
आपल्याला कष्ट पडले तरी चालतील ....
आपली फरपट झाली तरी चालेल
पण त्याच्या नशिबात कष्ट नकोत ..त्याची फरपट नको ...


जन्मल्यापासून तीन त्याची काळजी घेतली ..खूप सोसल ....
लहानाचा मोठा केला ...काळजाचा तुकडा म्हणून खूप जपल ...
आता तो मोठा झालाय....
कमाऊ लागलाय...स्वताचे निर्णय स्वत घेवू लागलाय ....
आज त्यान आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा एक निर्णय घेतलाय अन आईला ऐकवलाय...
त्याचा निर्णय ऐकून आज तिला पुन्हा असह्य वेदना झाल्या
पण किंकाळी नाही फोडता आली ..
.कारण तो मोठा झालाय ना....

आता त्याने तिला शाळेत टाकलंय...वृद्धांच्या शाळेत ...वृद्धाश्रमात ...
आताहि ती वाट पाहते त्याच्या येण्याची ...पण खिडकीच्या पलीकड्च काही काही दिसत नाही ...

आता तिच्याही तोंडून आई शब्द बाहेर पडतो ..पण पाठीत चमक उठल्यानंतर ...
ऐकायला कोणीच नसत ......कारण तो मोठा झालाय ...

ती पण पाऊल उचलते पुढे टाकण्यासाठी ...
गुढघ्याना भार सहन होत नाही ..कोलमडते ...पण काठीच्या आधारान पुन्हा उभी राहते ..
सावरते स्वताला ...
समजावते ....
येईल माझ लेकरू नक्कीच मला नेण्यासाठी ...
नाही आला तरी चालेल कारण तो आता मोठा झालाय ...त्याचा संसार मोठा झालाय ...

आंतरजालावरून साभार